नवीन शाळा प्रवेश अर्ज अर्ज आज दि. 01/04/2025 पासून सुरु होत आहे. आपण खालील लिंक च्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करू शकतात.
प्रवेश अर्ज लिंक : ऑनलाईन अर्ज
सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण हे शासनाचे उद्दिष्ट असताना पुणे महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेने फार पूर्वीपासूनच पुणे शहरातील सर्व सामान्य जनतेच्या मोफत प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.
पुणे महानगरपालिकेने सदरच्या पुणे मनपा शाळा क्र. ७४ मुलींची या मराठी शाळेची स्थापना सन १९७७ मध्ये केली. सुरुवातीला मुलींच्या शिक्षणासाठीचे विशेष प्रयत्न म्हणून मुलींच्या शाळेची स्थापना करण्यात आली. नंतर परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन शाळेत मुले-मुली अशी सहशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आजमितीला शाळेला मॉडेल शाळेचा दर्जा तसेच देशातील पहिल्या १०० मध्ये असण्याचा मान प्राप्त झाला आहे. शाळेत राबविले जाणारे विविध प्रकारचे शालेय व सहशालेय उपक्रम यामध्ये असणारा विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग यामुळे परिसरातील शासन संचलित प्राथमिक मराठी माध्यमाची आदर्श शाळा असा शाळेचा नावलौकिक आहे.
पुणे महानगरपालिकेच्या औंध प्रशासकीय विभागातील वारजे – कर्वे-नगर या शैक्षणिक विभागात असणारी हि शाळा परिसरातील नागरिकांच्या पसंतीस असलेली शाळा आहे. या शाळेचा कार्यभार सहाय्यक प्रशासकीय अधिकारी मा. श्री. शंकर मांडवे व पर्यवेक्षिका मा. सौ. अरुणा राहिंज यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रमुखांमार्फत चालवला जातो.
सदरच्या शाळेला बालवाडी संलग्न असून शाळेत इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंत प्राथमिकचे वर्ग आहेत.
डिजिटल क्षेत्राचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेता शाळेनेही आधुनिकतेची कास धरलेली आहे. शाळेच्या प्रत्येक वर्गात डिजिटल एल.इ.डी-टी.व्ही. हे सेवाभावी संस्थांच्या मदतीने बसविण्यात आले आहे.
सी.सी.टी.व्ही. च्या निगराणीत असणाऱ्या शाळेची स्वतः ची सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, विज्ञान प्रयोग शाळा आहे. व्हिडीओ कॉन्फेरेंसिंग या शाळेतील उपलब्ध डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातून विविध विषयाचे तज्ञ शाळेतील विद्यार्थ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन करतात.
पूर्णवेळ कार्यरत असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्याकडून विधार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वांगिण विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात. विद्यार्थी केंद्री अध्ययन-अध्यापन प्रक्रिया लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विशेष अध्ययन अनुभव दिले जातात.