शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६
प्लास्टिक मुक्त शाळा..
बुधवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी पुणे मनपा मॉडेल शाळा क्र. ७४ (मुलींची) येथे “आम्ही स्वच्हाग्रही उपक्रमाच्या पडताळणीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने ” अभ्यास दौरा निमित्त शाळेस अचानक भेट दिली. यामध्ये श्रीपाद दरवटकर, विवेकानंद रासुरे यांचा समावेश होता.
पुणे महानगरपालिका तर्फे संपूर्ण शहरात स्वच्छतेचा आग्रह धरला जात असून शहराच्या प्रत्येक भागात, वाडी वस्ती यामध्ये विविध मार्गाने प्रबोधन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेतून देखील जनजागृती व्हावी या उद्देशाने, स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्या जाव्यात या हेतूने “आम्ही स्वछाग्रही उपक्रम” राबविला जातो. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुजाता कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली “आम्ही स्वच्छतादूत समिती” नेमण्यात आली आहे.
शाळेत स्वच्छतेविषयी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये प्रत्येक सोमवारी विद्यार्थ्यांची नखे, केस यांची तपासणी केली जाते. जेवणाच्या सुट्टीत अगोदर व नंतर साबणाने हात स्वच्छ धुतले जातात. शाळेतील मोठ्या मुलींसाठी मासिक पाळी दरम्यान घ्यावी लागणारी काळजी व स्वच्छता याविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. शाळेने शालेय परिसर “नो प्लास्टिक झोन” म्हणून घोषित केला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता प्रतिज्ञा म्हणवून घेतली जाते. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व जनजागृती या उद्देशाने शाळेत चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वच्छताकर्मी यांना सन्मानित करण्यात आले.
"शिक्षण आपल्या दारी.." / गृहभेटीतून विद्यार्थी अध्यापन..
कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेले दिसून आलेत. यामध्ये शिक्षण क्षेत्रही अपवाद ठरले नाही. अशा वेळी मार्च २०२० समोर उभे ठाकलेल्या संकटाशी दोन हात करत शिक्षण क्षेत्रातील सर्वच शिक्षकांनी आपल्या बुद्धीचा कस लावून शिक्षणाची ज्ञानगंगा विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल, त्यांना शिक्षण प्रवाहात अखंडपणे कसे न्हाहून निघता येईल यासाठी सर्वच पर्यायांचा शोध घेऊन, प्रसंगी सर्वप्रकारचे तंत्रज्ञान अवगत करून युद्धपातळीवर प्रयत्न केलेत.
हे सर्व करत असतांना, महापालिकेची शाळा म्हटलं म्हणजे गोरगरीब, मोलमजुरी, अस्वच्च्छ कामगार कुटुंब यांच्या मुलांची शाळा असा एकूणच प्रघात आहे. अशावेळी त्यांच्याकडे कुठून येणार “ऑनलाइन शिक्षण सुविधा” हा विचार आमच्या विद्यालयातील सर्वच शिक्षकांना सतावत होता. सर्व चर्चा व विचारांती आम्ही कोणत्याही “ऑनलाइन शिक्षणसुविधा” नसलेल्या खास “ऑफलाईन” विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. चित्रा पेंढारकर यांनी “शाळा आपल्या दारी..” हा अभिनव उपक्रम सुरु केला.
विद्यालयाच्या शिक्षिका सौ. चित्रा पेंढारकर यांनी अशा कठीण प्रसंगी खास “ऑफलाईन” माध्यमातील विद्यार्थ्यांना कोविड – १९ ची झळ पोहोचू नये म्हणून गृहभेटीचे नियोजन केले. त्यांनी विशेष वेळापत्रक बनवूनच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, वाडी – वस्ती जेथे जवळपासच्या घरातील सर्व वयोगटाची लहान-मोठे मुले सामाजिक अंतर ठेवून एकत्र येऊ शकतात अशापद्धतीने कृती युक्त शिक्षण पद्धतीचा वापर करून प्रत्यक्ष अध्यापन केले. त्यांच्या या प्रयत्नांना वाडी – वस्ती मध्ये असणाऱ्या थोरा-मोठ्यांचे सहकार्य लाभले. परिसरातील मंदिरे, सार्वजनिक खोल्या यांची उपलब्धता त्यांनी करून दिली.
बदलत्या काळातील तंत्रज्ञानाची गरज ओळखून या विद्यार्थ्यांना देखील तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी सौ. चित्रा पेंढारकर यांनी आपल्या सामजिक ओळखीच्या माध्यमातून रोटरी क्लब ओंफ पुणे यांच्या सहकार्याने समाजातील दानशूर व्यक्तींच्या दानातून शाळेसाठी एकूण ३० टॅब उपलब्ध करून घेतले. आणि उपलब्ध झालेले हे टॅब विद्यार्थ्यांना हाताळता यावे त्याचा शिक्षणासाठी परिणामकारक वापर व्हावा या उद्देशाने हे टॅब घेऊन थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ते विद्यार्थ्यांना हाताळावयास दिले.
पुणे मनपा, प्राथमिक शिक्षण विभागातील तसेच DIET, पुणे व शालेय स्तरावरील सर्व अधिकारी व शिक्षकांनी सदर उपक्रमाची दखल घेऊन भरभरून कौतुक तर केलेच याशिवाय शक्य ती मदत करण्याचा विश्वास हि दिला.
“गंमत – जंमत” साप्ताहिक
पुणे मनपा मॉडेल शाळा क्र. ७४ (मुलींची) तर्फे कोरोना काळाचा विचार करून ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, दूरचित्रवाणी, रेडियो अशा कोणत्याही सुविधा नाहीत अशा ऑफलाईन माध्यमातील विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोहोचविण्यासाठी विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री. श्रीकांत सुधाकर देवकर यांनी “गंमत-जंमत” हे साप्ताहित सुरु केले. यास वारजे कर्वेनगर परिसरातील मनपा शाळा तसेच खाजगी शाळा यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे ऑफलाईन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय झाली. या साप्ताहिकाचे उद्घाटन पुणे मनपा चे प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सौ. मीनाक्षी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एरंडवणे विभागातील नगरसेविका तसेच महिला व बालविकास कल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. माधुरीताई सहस्रबुद्धे यांनीही सदर साप्ताहिकाचे कौतुक केले... याशिवाय प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र “Times of India” ने देखील या कार्याचे कौतुक केले...
याशिवाय प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र “Times of India” ने देखील या कार्याचे कौतुक केले...