शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे महानगरपालिका
शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे महानगरपालिका
पंडित दीनदयाळ उपाध्याय
नाव - पंडित दीनदयाळ उपाध्याय
जन्म - 25 सप्टेंबर 1916 मध्ये चंद्रबन, नगला, जिल्हा - मथुरा, उत्तरप्रदेश
मृत्यु - 11 फेब्रुवारी, 1968 मुगलसराय रेल्वे स्थानक, उत्तरप्रदेश
शिक्षण - बी.ए. प्रथम श्रेणी उत्तीर्ण
कार्य - पत्रकार, लेखक, एकात्म मानवतावादाचे प्रणेते..
पंडित दीनदयाळ उपाध्याय जीवनपट...
जीवनपट :
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म २५ सप्टेबर १९१६ रोजी उत्तरप्रदेशात मथुरा जिल्ह्यातील चंद्रबन येथील नगला गावी झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री. भगवतीप्रसाद तर आईचे नाव रामप्यारी असे होते.
पंडितजींचे वडील रेल्वेमध्ये सहाय्यक स्टेशन मास्तर या पदावर कार्यरत असल्याने दीर्घकाळ घरापासून दूर असायचे. धार्मिक विचार असणाऱ्या त्यांच्या आईने वडिलांच्या अनुपस्थित घराची जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळली होती. काही कालावधीनंतर त्यांचे छोटे बंधू श्री. शिवदयाळ यांचा जन्म झाला.
पंडितजी केवळ अडीच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांच्या आईची तब्येत खालावली व त्या सारख्या आजारी राहू लागल्या. अखेर ८ ऑगस्ट १९२४ रोजी त्यांचेही निधन झाले. वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी पंडितजी आई-वडिलांच्या छत्राला पोरके झाले.
आई-वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या धनकीया या राजस्थानातील गावी त्यांचा आजोबांनी केला. वयाच्या १० व्या वर्षी त्यांचे आजोबांचे छत्र देखील हरपले. पुढे त्यांचे मामा यांनी स्वत:च्या मुलाप्रमाणे त्यांचे पालनपोषण केले. त्यांच्या देखरेखीत पंडितजींनी आपले शिक्षण पूर्ण केले. लहान वयातच स्वत:च्या पालनपोषणासोबतच लहान भावडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.
शिक्षण:
शिक्षण मिळविण्यासाठी त्यांनी सिकर, राज्यस्थान येथील माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. आणि शाळेच्या बोर्ड परीक्षेत त्यांनी अव्वल क्रमांक पटकाविला. त्यांच्यामधील बुद्धिमत्ता पाहून सिकर संस्थानच्या महाराजा कल्याण सिंह यांनी त्यांचा सुवर्णपदक देऊन सत्कार केला. याशिवाय पुढील शिक्षणासाठी त्यांना दरमहा १० रुपये शिष्यवृत्ती तर पुस्तक खरेदीसाठी रुपये २५० रोख रक्कम देऊ केली.
पंडितजी लहानपणापासून बुद्धिमान होते. त्यांनी आपले इंटरमिजीएट शिक्षण बिरला कॉलेज, पिलानी येथून पूर्ण केले तर सनातन धर्म कॉलेज, कानपूर येथून १९३९ मध्ये प्रथम श्रेणीतून बी.ए. ही पदवी संपादित केली. आपले शिक्षण पुढे सुरु ठेवण्यासाठी त्यांनी इंग्रजी विषयाच्या पदव्युत्तर पदवी (M.A. English) साठी सेंट जॉन्स कॉलेज, आग्रा येथे प्रवेश घेतला. प्रथम वर्ष प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करूनही घरातील मामेबहिणीच्या आजारपणात कराव्या लागणाऱ्या सेवेमुळे त्यांना शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले.
मामांच्या सांगण्यानुसार पंडितजी यांनी प्रशासकीय परीक्षेस बसले व उत्तीर्ण होऊन मुलाखतीत निवडले देखील गेले. परंतु नोकरीत स्वारस्य नसल्याने ते नोकरी सोडून प्रयाग (इलाहाबाद) येथे एल.ती. च्या शिक्षणासाठी गेले.
इ.स. १९४२ मध्ये एल.टी. परीक्षा त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली, ही त्यांच्या विद्यार्थी दशेतील शिक्षणाची शेवटची पायरी ठरली. यानंतर त्यांनी लग्न व धनोपार्जन न करता आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्र निर्माण व सामाजिक कार्य यात वाहून दिले.
सामाजिक कार्यासाठी समर्पण व आर.एस.एस. मध्ये प्रवेश
१९३७ मध्ये कानपूर येथे बी.ए.चे शिक्षण सुरु असतांनाच ते आपले सहाध्यायी श्री. बाळूजी महाशब्दे व श्री. सुंदरसिंह भंडारी यांच्यासोबत मिळून समाजसेवा करू लागले. याच दिवसांत त्यांची भेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे संस्थापक डॉ. हेडगेवार व संघ कार्यकर्ते श्री. भाऊराव देवरस यांच्याशी झाली.
आर.एस.एस. च्या विचारांमुळे ते प्रभावित होऊन संघाशी जोडले गेले. संघांचे कामकाज समजून घेण्यासाठी त्यांनी १९३९ मध्ये आर.एस.एस. च्या नागपूर येथील ४० दिवसीय शिबिरात सहभाग घेतला.
पत्रकारिता :
श्री. भाऊराव देवरस यांच्याकडून प्रेरणा घेऊन इ.स. १९४७ मध्ये पंडितजींनी लखनऊ येथे “राष्ट्रधर्म प्रकाशन” संस्थेची स्थापना केली. ज्यामधून मासिक पत्रिका “राष्ट्रधर्म” प्रकाशित व विरारीत केली जाऊ लागली. यानंतर “पांचजन्य” साप्ताहिक आणि दैनिक वृत्तपत्र “स्वदेश” चे प्रकाशनदेखील येथूनच होऊ लागले. हिदुत्त्ववादी विचारसरणीचा प्रचार व प्रसार हा मुख्यउद्देश या प्रकाशित साहित्याचा होता.
आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल... अजूनही हे प्रकाशन अविरतपणे कार्यरत आहे. “पांचजन्य” हे दिल्ली येथून तर “स्वदेश” आणि “राष्ट्रधर्म” लखनऊ येथून प्रकाशित होतात. “स्वदेश” चे नाव बदलून “तरुण भारत” करण्यात आले आहे.
यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे पंडितजी कधीही या प्रकाशनाचे प्रत्यक्ष संपादक झाले नाहीत मात्र संचालक, संपादक, व आवश्यकता असेल तेव्हा त्याचे कम्पोजीटर, मशीनमैन तसेच छोटे-मोठे सर्व कामे त्यांनी स्वतः केली. ते छोट्यातील छोटे काम देखील महत्तपूर्ण मानायचे, त्यांनी पद व प्रतिष्ठा यांना कधीही अवास्तव महत्त्व दिले नाही.
लेखन
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे उत्तम लेखक व प्रगल्भ साहित्यिक देखील होते. संघ परिवाराशी जोडले गेल्यानंतर संघाची विचारसरणी तरुणांवर पोहोचविण्यासाठी त्यांनी १९४६ मध्ये रात्रभर जागून “सम्राट चंद्रगुप्त” कादंबरी लिहिली व ती संघकार्यकर्ते श्री. भाऊराव यांच्याकडे सुपूर्द केली. या कादंबरीस प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी तरुणांसाठी आणखी लेखन करावे अशी समाजातून मागणी होऊ लागली. यानंतर त्यांनी “जगद्-गुरु शंकराचार्य” नावाने दुसरी कादंबरी लिहिली. फक्त कादंबरीमध्ये अडकून न राहता त्यांनी आपले विचार वेगवेगळ्या वृत्तपत्रातील लेखांमधून जनतेसमोर मांडले. ज्यामध्ये खालील विषयांचा प्रामुख्याने समावेश होता... “अखंड भारत कशासाठी ..?”, “राष्ट्रीय जीवनातील समस्या..”, “राष्ट्रचिंतन”, “भारतीय अर्थव्यवस्थेचे अवमूल्यन” इ.
पंडितजी यांनी आर.एस.एस चे संस्थापक, के. बी.हेडगेवर यांच्यावरील मराठी जीवन-चरित्राचा अनुवाद हिंदी भाषेत केला. पंडितजी स्वाध्याय (self-study) यावर खूप जोर देत होते. त्यांचे असे म्हणणे होते की, पठण-पाठण आणि चिंतन-मनन च्याआधारेच मनुष्य ज्ञान आत्मसात करतो.
राजकारणात प्रवेश :
आपल्या आयुष्यातील यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ देशसेवेचे व्रत अंगिकारले. २१ ऑक्टोबर 1951 मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आर.एस.एस ला विश्वासात घेऊन भारतीय जनसंघ (म्हणजेच आत्ताची भारतीय जनता पार्टी ) ची स्थापना केली.
1952, मध्ये कानपुर येथे झालेल्या पार्टीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना या नवीन जनसंघाचे महामंत्री म्हणून निवडण्यात आले. येथूनच पुढे संपूर्ण भारतीय स्तरावर पंडितजी यांच्या राजकीय प्रवासास सुरवात झाली. पंडितजी यांनी आपल्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या वैचारिक क्षमतेचा परिचय देत 7 प्रस्ताव प्रस्तुत केले आणि सर्वच प्रस्तावासाठी मंजुरीदेखील मिळवली. त्यांची कार्यक्षमता, परिश्रम आणि परिपूर्णता या गुणांनी प्रभावित होऊन डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले होते – “जर मला असे दोन दीनदयाळ मिळाले तर मी देशाचा राजकीय नक्शाच बदलून टाकेन...”
डॉ. मुखर्जी यांच्या याच प्रेरणेने पंडितजींचा उत्साह वाढत गेला. परंतु १९५३ मध्ये डॉ. मुखर्जी यांचे आकस्मिक निधन झाले आणि भारतीय जनसंघ व्यवस्थितपणे संभाळण्याची जबाबदारी पंडितजी व त्यांचे सहकारी यांच्यावर आली.
जनसेवेसाठी समर्पित जीवन :
पंडितजी राष्ट्रनिर्माण व जनसेवा यामध्ये इतके एकरूप झाले होते की त्यांचे कोणतेही खाजगी आयुष्य शिल्लक राहिले नव्हते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन आर.एस.एस आणि भारतीय जनसंघ यांना मजबूत बनविण्यासाठी आणि या संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करण्यासाठी समर्पित केले. पंडितजींचे विचारच त्यांना इतरांपासून वेगळे बनवितात. त्यांना एक चिंता कायम सतावत होती ती म्हणजे.. “दीर्घकालीन गुलामीनंतर पाश्चिमात्य संस्कृतीने प्राचीन भारतीय संस्कृती व परंपरा यावर अधिराज्य गाजवू नये.”
भारत एक लोकशाहीप्रधान देश म्हणून निर्माण झाला होता. परंतु पंडितजी यांना तरीही भारताच्या विकासाची चिंता सतत भेडसावत असे. त्यांचे असे मानने होते की, लोकशाही ही इंग्रजांनी दिलेली भेट नसून तो भारतीयांचा अधिकार आहे. विविध कर्मचारी आणि कामगार यांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविण्यासाठी तत्पर असणे तसेच राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. लोकशाहीने कधीही आपली सीमा ओलांडू नये, जनतेचे मत आणि त्यांचा विश्वास हाच देशाच्या उन्नति आणि प्रगति साठी आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.
एकात्म मानववाद ( Integral Humanism)
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववाद च्या आधारे एका अशा राष्ट्राची कल्पना केली की ज्यामध्ये विविध राज्यांच्या संस्कृती विकसित होतील व एक असा मानव धर्म उत्पन्न होईल, की ज्यामध्ये सर्व धर्मांचा समावेश असेल, ज्यामध्ये प्रत्येकाला समान संधी आणि स्वातंत्र्य मिळेल, असे राष्ट्र एक सुदृढ़, सम्पन्न आणि जागरूक राष्ट्र म्हणून जगभरात नावलौकिक मिळवेल.
भारतीय जनसंघ चे अध्यक्षपद व अकस्मात मृत्यु :
इ.स. १९५१ पासून 1967 पर्यंत जवळपास 16 वर्षांपर्यंत त्यांनी भारतीय जनसंघाचे महामंत्री पद भूषविले. 29 डिसेंबर 1967 मध्ये पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. परंतु दुर्दैवाने रहस्यमय स्थितीत केवळ ४४ दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. प्रवासाच्या दरम्यान अधिकाधिक कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी पंडितजी नेहमीच रेल्वेच्या तृतीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करायचे. परंतु पार्टीचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच लखनऊ वरून पटना येथे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रथम श्रेणीचे तिकीट बुक केले आणि त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला. मुगलसराय जंक्शन च्या रेल्वे रुळाशेजारी त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला.
आजही पंडितजी सर्व जनमाणसांच्या हृदयात विराजमान आहेत. त्यांचे विचार आजही देशाला प्रगतीच्या वाटेने घेऊन जात आहेत. लोकशाही ही सर्वांसाठीच एकसमान आहे ही त्यांचीच विचारधारा आज भारताचा विश्वास बनला आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुगलसराय जंक्शन या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय हे नाव देण्यात आले आहे तर देशभरातील अनेक संस्था, विश्वविद्यालये, दवाखाने यांनी त्यांची आठवण नामस्वरुपात चिरंतन ठेवली आहे.
परब्रम्हात विलीन होऊन देखील पंडितजी यांचे लेखन, ज्ञान, शिकवण आणि उच्च विचार आजही आपल्या मनावर ठसा उमटवत आहेत. अशा महान व्यक्तिमत्त्वाला आमचे कोटी-कोटी नमन..!